जीवन संघर्षमय आहे. या संघर्षात यशस्वी होणेसाठी वय वर्ष 15 ते 21 हे विध्यार्थी दशेचं वय खुप महत्वाचे असते. या वयातच जीवनाला आकार मिळतो कारण या वयात चांगल्या-वाईटातील फरक समजत नसतो. या वयात योग्य दिशा, उद्दिष्टाची निश्चिती व अथक प्रयत्नांची सवय झाली की आयुष्य सफल व सुंदर बनते. तेव्हा या वयात अभ्यासावर, व्यायामावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरेपाटील यांनी तरूण-तरूणींना दिला.
ते पेठवडगाव येथे विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित समुपदेशनपर व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ होते. प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.विद्या पोळ, शाहू शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा विजयादेवी यादव आदी होते.
स्पर्धा परिक्षेत अथवा इतर करियर मध्ये यशस्वी होणेसाठी आपल्याकडे उपलब्ध असणा-या वेळेचे नियोजन काटेकोरपणे करा. वेळेचे महत्व त्यांनी विशद केले. तसेच अभ्यासांचे नियोजन व अंमलबजावणी महत्वाची असते. वेळ न घालवता भरपूर अभ्यास करा असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी होण्यासाठी नियोजन, पुर्वतयारी, स्वतःवर विश्वास, सकारात्मक दृष्टीकोण, नकारात्मक बाबींपासून दुर राहणे, विध्वंसक गोष्टीपासून दूर राहणे, प्रचंड कष्ट करा, चाकोरीबाहेरील गोष्टी करण्याची तयारी ठेवा ही यशाची सुत्रे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
स्पर्धा परिक्षेत जीवनात यशस्वी होणेसाठी स्वपरिक्षण करुन स्वतःची बलस्थाने व कमतरता जाणून घ्या. संधी व संभाव्य अडचणी, धोके ओळखून योग्य नियोजन करावे , संकटे येणारच तरी हतबल न होता हि संकटे हाच यशाकडे नेणारे मार्ग आहेत या दृष्टीने संकटाकडे मार्गदर्शक म्हणुन पहा तसेच चंगळवाद व क्षणिक सुखाच्या मागे न धावता आव्हाने स्विकारून आयुष्यातील स्वप्ने पुर्ण करण्यासाठी तयार व्हा असे आवाहन त्यांनी केले.
0 comments:
Post a Comment