Sunday, 28 May 2017

हल्ली कार चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे, पण चोरीला गेलेली कार परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते व पोलिसांना विचारले तर तपास सुरू आहे हे पठडीतले उत्तर मिळते पण याला अपवाद अशी एक घटना नुकतीच घडली आहे.
        बहिरेवाडी येथील डॉ अभिजित जाधव यांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीला त्याची चोरीला गेलेली कार पुन्हा मिळाली आहे.
             याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजीतील दादासो सुतार यांची मारुती 800 कार नरसोबाची वाडी येथुन दि. 21 मे 2017 रोजी चोरीला गेली होती त्याबाबतीत त्यांनी तशी तक्रार दाखल केली होती.
           बहिरेवाडी येथील डॉ. अभिजित जाधव हे जोतिबा शासकीय रुग्णालयात 108 अ‍ॅम्ब्युलन्सवर कार्यरत आहेत, ते रोजप्रमाणे बहिरेवाडी ते जोतिबा ड्युटीवर जात असताना त्यांना केखले गावाजवळ एक बेवारस मारुती 800 कार निदर्शनास आली व त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती मिळाली नाही.
       सलग दोन दिवस हि बेवारस कार त्याच जागी उभी पाहून त्यांना शंका आली व सदर कारची पोलिसांना माहिती दिली पण पोलिसांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परत दि. 24 मे रोजी कार जैसे थे पाहून मग त्यांनी सोशल मीडियावर व्हॉटस अपच्या माध्यमातून सर्व ग्रुपमध्ये बेवारस कारची पोस्ट पाठवली व मालकाला माहिती देण्यासाठी आवाहन केले, अवघ्या 4 तासात त्यांच्या प्रयत्नांना यश आले व गडकोट दुर्ग प्रेमी या ग्रुपवर त्यांना कार मालक दादासो सुतार रा. कलानगर, इचलकरंजी यांनी संपर्क साधला, नंतर कारची ओळख पटवून व पोलिसांना सुचित करून गाडी ताब्यात देण्यात आली.
हि कार चोरीला गेले नंतर कदाचित पेट्रोल संपल्यावर चोर केखले गावाजवळ सोडून गेले असावेत असे वाटते.
           आपली चोरीला गेलेली कार डॉ अभिजित जाधव यांच्या सतर्कतेमुळे व सोशल मीडियाच्या वापरामुळे त्यांना लगेचच परत मिळाली व याबद्दल सुतार यांनी डॉ. जाधव यांचे शतशः आभार मानले.
           तसेच घटनास्थळावरून व परिसरामधिल नागरिकांकडून डॉ. अभिजित जाधव यांचे कौतुक केले जात आहे.
        सोशल मीडियाच्या विधायक वापरामुळे चोरीला गेलेली कार परत मिळण्याची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

Friday, 26 May 2017

समतानगर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांची नुकतीच बदली झाली यावेळी समतानगर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील नागरिक व मंडळांच्या वतीने त्यांना निरोप दिला
यावेळी उपस्थितांकडून त्यांचे झालेले कौतुक उपस्थितांच्याच शब्दात

समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या आम्हा सर्वांच्या परिचयाच्या व एक आदर्श व्यक्तिमत्व तसेच दमदार नेतृत्व पोलीस निरीक्षक सुनैना नटे मॅडम यांची आज समतानगर पोलीस ठाणे येथून बदली झाली आहे.
मॅडम नी त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय फारच सामंजस्याने घेतले, घरगुती वाद, फसवणुकी चे प्रकरण, मैत्रीमध्ये वैर अश्या प्रकरणात मॅडम असे काही निर्णय घेत कीे ते प्रकरण कोर्टात न जाता त्याक्षणी परस्परांन मधला गैरसमज करून सोडविले जात.
अनेक मंडळातील सामाजिक कार्यक्रमात मॅडम स्वतःहून भेट देत व आपसातील सामाजिक ऐक्य कसे वाढवावे  किंवा तरुणांनी पोलीस मित्र का व्हावे ? असे जिकरीचे प्रश्न मॅडम मांडत असत.
आमच्या समस्त मित्रांमध्ये आज जो काही पोलीस मित्र असण्याचा अभिमान आहे तो फ़क्त आणि फक्त मॅडम मुळेच...
मॅडम आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि तो आयुष्यभर असेल

पुण्याई संघ परिवार सेवा संस्था
प्रवीण मुरलीधर गायकवाड
                
दक्खन युवा प्रतिष्ठान
राहुल रानोबा कोळेकर

प्रतिनिधी - संदीप पोवार

कोल्हापूर  : शाहू सांस्कृतिक भवन (मार्केट यार्ड) येथे दि.23 रोजी फणस विक्रेत्याच्या खून झाला होता या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपीला अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपी किरण भगवान मोहिते ( वय ३०) रा. तावडे हॉटेल नजीकच्या झोपडपट्टी याच्या मुसक्या आवळल्या आहेत .
   या प्रकरणी क्राइम डायरी प्रतिनिधीला माहिती देताना शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले कि
किरण मोहिते हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे व मंदिर दानपेट्या फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तो व त्याची बायको पूजा (वय २५) हे भंगार व बाटल्या गोळा करण्याचे काम करतात
ते दोघे मार्केट यार्ड परिसरात २२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिरत असताना फणस खरेदीसाठी केरबा कांबळे (वय ५०) रा. शेणवडे ( ता. गगनबावडा) यांच्याकडे गेले  फणसाच्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाला. कांबळे यांनी त्यांचे मळलेले कपडे बघून त्यांना भिकारी समजून त्याला शिवीगाळ केली. याच्या रागातून मोहिते याने रात्री फुटपाथवर झोपलेल्या केरबा कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. 
यानंतर पोनि प्रविण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गेंजगे व पो नाईक मुल्ला यांनी हा परिसर पिंजून काढत खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किरणला अटक केली.त्याला पोलीस स्टेशनला आणुन कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या खुनात आपली पत्नी पूजाही सामील असुन आपण दोघे एकत्र जाउन मृताच्या डोक्यात दगड घालून खुन केला असे सांगितले.

Thursday, 25 May 2017

लातूर जिल्ह्य़ातील निलंगा येथे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत, किरकोळ इजा झाली आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले

निलंग्याहून मुंबईत हेलिकॉप्टरने येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर अंदाजे 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टरचे पंख व विद्युत तारेच्या संपर्कामुळे हि दुर्घटना घडली असावी.

यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाटील, प्रधान सचिव प्रवीण परदेशी हेलिकॉप्टरमध्ये होते. हे चारही जण सुखरुप आहेत.

, मुख्यमंत्री सध्या लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी आहेत.

Wednesday, 24 May 2017

मुरगुड प्रतिनिधी (समीर कटके)
कुरणी ता.कागल येथील नदीकाठच्या गट क्रमांक 193 मध्ये बेकायदेशीररित्या मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरु आहे.संबंधितांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नसताना देखील महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे.या संदर्भात याच गावातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील त्यावर प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत लोकांमध्ये  संशय व्यक्त होत आहे.
       कागल तालुक्यातील कुरणी येथे नदी काठावर गट क्रमांक 193 मध्ये शंकर महादेव माने,विजय शंकर माने,शंकर माने,राजाराम हरी माने,नंदकुमार हरी माने या शेतकऱ्यांनी गेल्याचार महिन्यापासून जेसीबीच्या साहाय्याने शेकडो ट्रॉल्या मातीचे उत्खनन केले  आहे. यासाठी त्यांनी  महसूल विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.शिवाय मातीची कसलीही रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही.बेजबाबदारपणे केलेल्या  उत्खननामुळे नदीकाठच्या गाळमिश्रित जमिनीची धूप होत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची झीज होत आहे. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या पावसात वेदगंगेचे पाणी शेतजमिनीमध्ये घुसून खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कुरणी येथील शेतकरी शंकर सिध्दू संकपाळ यांनी 9 मार्च 2017 रोजी कागल तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रार अर्जाच्या  प्रती त्यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री,पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रातांधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या आहेत.
       महसूल विभागात रितसर लेखी तक्रार करून देखील या विभागाने संबंधितावर कसलीही कारवाई केलेली नाही. या माती उत्खननाच्या प्रकरणामध्ये संबंधितांनी 'खिसे' भरले असल्याची चर्चा परिसरात आहे.

Tuesday, 23 May 2017

काश्मीरमध्ये होणाऱ्या घुसखोरीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त केले आहेत. या धडाकेबाज कारवाईचा व्हिडिओच लष्करानं आज प्रसारमाध्यमांना दिला आहे. 
      भारतीय लष्कराचे मेजर जनरल अशोक नरुला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानी घुसखोरीविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली.

पाकिस्तानी चौक्या सशस्त्र घुसखोरांना, दहशतवाद्यांना मदत करत होत्या. त्यामुळे आम्ही त्यांच्या चौक्या आणि बंकर उद्ध्वस्त केले', असं नरुला यांनी सांगितलं. 
या अतिरेकी व त्यांना मदत करणारे पाकचे सैनिक मोठ्या प्रमाणावर मारले गेले व जखमी झाले असण्याची शक्यता आहे कारण जवळपास 21 बॉम्बचा वर्षाव झाला आहे.

Sunday, 21 May 2017

तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या सोमवार (22 मे) रोजी होणार आहे. पण यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमांनी ही दगडफेक केली असून त्यात गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचं समजतं.ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगानं धावू शकणारी 'तेजस' शुक्रवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाली.यावेळी हि गोष्ट लक्षात आली .यावरून भारतीय नागरिकांची मानसिकता लक्षात येऊ शकते ,या ट्रेनचे ज्या समाजकंटकांनी नुकसान केले आहे त्यांना धडा शिकववलाच पाहिजे

Saturday, 20 May 2017

.

'तरुण भारत' चे उंब्रजचे पत्रकार प्रवीण कांबळे यांना तासवडे टोलनाक्यावर टोल वसुली करणाऱ्या गुंड कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.

प्रवीण कांबळे उंब्रजहुन कराडकडे जात असताना तासवडे टोलनाक्यावर मुजोर टोल नाका कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत होते.प्रवीण यांनी हा प्रकार बघता क्षणी तो खाली उतरला. व डोळ्यापुढे सुरू असलेला प्रकाराचे फोटो काढू लागला, तेव्हा टोलनाका कर्मचाऱ्यांनी थेट त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली.त्याचा मोबाईल  काढून घेतला व थेट मारहाण केली .
घडला सारा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद आहे
हि घटना कर्तव्यदक्ष असणाऱ्या सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कार्यक्षेत्रात घडली आहे
संबंधित टोल कंपनी, त्याचे मालक-चालक व टोल कर्मचाऱ्यांवर
"नव्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे" अशी सर्व पत्रकारांनी मागणी केली आहे.

स्त्रोत - जिल्हा पत्रकार संघ WhatsApp group 

क्राईम डायरीच्या वतीने पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तीव्र निषेध !

   

Friday, 19 May 2017

प्रतिनिधी - संदीप पोवार
शाहुपूरी पोलिस ठाणे गुन्हा भा.द.वि.स.कलम 454.457.380 .प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी रसूल अन्वर  सय्यद   रा. विचारे माळ. झोपडपट्टीत. कोल्हापूर. याने दिनांक 26/2/2015 रोजी 23.00 वाजता ते दिनांक 27/2/2015 रोजी सकाळी 7.00वाजता दरम्यान मुदतीत देवेंद्र शिवलाल हरव्यासी रा.राजगृह हैसिंग सोसायटी .विचारे माळ. कोल्हापूर. यांचे बंद घराचे कडी कोयंडा सोडुन आत प्रवेश केला होता घरातील सोन्याचे मंगळसूत्र, मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी करून चोरून नेलेचा गुन्हा दाखल होता. या घरफोडी चोरी गुन्ह्यांचे तपास अंतर्गत त्याचे विरूद्ध मा.न्यायालयात दोषाआरोपत्र दाखल केले होते,
सदर केसची सुनावणी होऊन त्यामध्ये
सरकारतर्फे या खटल्यात सरकारी वकील श्रीमती रजनी बुजरे यांनी केलेला युक्तीवाद मान्य करून आरोपी रसूल सय्यद याला मा.मुख्य न्यायदंडाधिकारी देशमुख यांनी 2 दोन वर्षे सक्तमजुरी व 2000 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सदर गुन्ह्यांचे तपास पोलीस हेड काॅ.रवि पाटील व सुनिल कवळेकर यांनी केलेला आहे.

प्रतिनिधी - संदीप पोवार

विलास राठोड  रा. कदमवाडी  भोसलेवाडी
गणपती मंदिर शेजारी हा कारचालक स्विफ्ट डिझायर गाडी नंबर MH 07 Q 9919 भरधाव वेगात चालवत असताना रात्री 11.30. ते 11. 45 दरम्यान कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील हाॅटेल अॅट्रिया जवळ  रस्त्यावर वरील डिवायडरवर जाऊन स्विफ्ट डिझायर गाडी पलटी  झाली.  यावेळी मोठा आवाज आला व आसपासच्या लोकांनी धाव घेतली, यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण गाडीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .
..   याप्रकारामुळे कोल्हापूरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह च्या घटना वारंवार घडत आहेत हे सिध्द होते, परवाच मद्यधुंद ट्रक चालकाने अनेकांना उडवून जखमी केले होते आणि आज ही घटना घडली आहे. यावरुन मद्यपि वाहन चालकांना पोलीसांचा धाक राहिला नाही असे वाटते. तसेच पोलिसांनी सुद्धा मद्यपान करून वाहन चालवणार्‍या एकाही चालकाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली नाही, पोलिसांना दिलेल्या ब्रेथ अँनालायझर मशिन या फक्त 31 डिसेंबरलाच वापराव्यात असा नियम आहे का ? पोलिसांनी केवळ दिखाऊ व पैसा गोळा करून दंड कारवाई न करता वाहनचालकाला खरोखरच जरब बसेल अशी शिक्षा न्यायालयामार्फत करावी व ड्रंक अँड ड्राईव्ह ची मोठी दुर्घटना टाळावी.

Thursday, 18 May 2017

भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
  आज दुपारी 3.30 या भारतीय वेळेनुसार सुनावणी झाली त्या वेळी न्यायमूर्तींनी पाकिस्तानला चांगला झटका दिला.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकचं अक्षरशः वाभाडे काढले.

Wednesday, 17 May 2017





महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपुरात  श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविकांची गर्दी होत असते , भक्त आपल्या कुवतीप्रमाणे हार व प्रसाद अर्पण करत असतात पण श्री विठ्ठल मंदिरात आज (बुधवार) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली ,दर्शनासाठी आलेल्या भाविकाने दर्शन घेताना त्याच्या हातातील हार श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मूर्ती शेजारी उपस्थित असलेल्या मंदिर समितीचे पुजारी अशोक भणगे यांनी हार अडवून त्या भाविकाला माराहाण केली. मंदिर समितेचे पुजारी हे स्वतः मालक असल्याचे समजतात ,यापूर्वीही भट पुजार्यांनी  असे अनेक कारनामे केले  असून ते विठ्ठलाच्या मंदिराला स्वतःची खाजगी मालमत्ता समजणे समाजाच्या दृष्टीने घातक आहे .
      या घटनेची समजलेली माहिती अशी की, दत्तात्रय सुसे (रा. शेवगाव जि.अहमदनगर) हे त्यांच्या कुटुंबियांसह श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी श्री विठ्ठलासाठी सोबत फुलांचा हार हातात नेला होता.त्यांनी दर्शन घेऊन त्यांच्या हातातील हार श्री विठ्ठलाच्या मूर्तीला घालण्याचा प्रयत्न केला तेंव्हा उपस्थित पुजारी भणगे याला राग आला त्याने  हार का घातला ? असे म्हणून चिडून भाविक दत्तात्रय सुसे यांना कानाखाली मारली व  मारहाण करुन त्यांना शिवीगाळ केली.
               सुसे यांच्या चेहऱ्यावर मारहाणीमुळे वण उमटले असून, त्यांनी या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन पुजारी अशोक भणगे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.आता पोलीस याप्रकरणी खरोखरच दाखल घेऊन सुसे याना न्याय मिळवून देतात का भणगे या ला पाठीशी घालतात हे पाहावे लागेल .
              मात्र या अमानुष घटने पंढरीची आणि मंदिर समितीची नाचक्की झाली असून , अश्या भटुरड्या पुजाऱ्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे व त्याची तात्काळ पुजारी पदावरून हकालपट्टी करून त्याला मंदिरप्रवेश निषिद्ध करावी अशी मागणी होत आहे ,

Monday, 15 May 2017

प्रतिनिधी - बाबासो जाधव
तांदूळवाडी दि. 14/05/2017

तांदूळवाडी गावात श्रीमती सावित्री बाबासाहेब पाटील वय 75 या मुलगा व सुन यांच्यासह वास्तव्यास होत्या, त्या वार्धक्यामुळे कॉटवर झोपून होत्या, त्यांचा मुलगा व सुन शेतात गेले असता सायंकाळी 5 च्या सुमारास घरात वायरिंगला शॉर्ट सर्किट ने आग लागली व ती सर्वत्र पसरली,  वृद्ध महिला झोपलेल्या जागेवर वरती माळा आहे त्यात बारदान, लाकडे व कपडे होते, हे सर्व पेटून वृद्धेच्या अंगावर पडले, क्षणार्धात अंगावरील चादर व कफड्यांनी पेट घेतला व सावित्री यांचा होरपळून मृत्यू झाला, या  दुर्घटनेबद्दल गावात शोक व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी - संदीप पोवार
मद्यपान केलेल्या चालकाने कोल्‍हापुरातील लक्ष्मीपुरीतून कोंडाओळ पुलावरून कार, दुचाकीला उडवत भाउसिंगजी मार्गावरील एकेरी मार्गात घुसून  ऐतिहासिक वास्तू असणार्‍या भवानी मंडपाला  जोरदारपणे ट्रक (एमएच ५० ४४३२) येवून धडकला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून दोघेजण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंडाओळ येथील कारला धडक दिलेल्यामधील कारचालकही जखमी आहे. संतप्त जमावाने  ट्रकचा पाठलाग करण्याचा प्रयत्‍न केला मात्र अनेक वाहनांना धडक देत  ट्रक न थांबवता भवानी मंडपाला ट्रक धडकला.
भवानी मंडपातील कमानीमुळे ट्रक त्यावर जावून धडकला. यामुळे पुढील अनर्थ टळला. संतप्त जमावाने ट्रकवर हल्‍ला करण्याचा तसेच ट्रक चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत मद्यपि ट्रक चालकाला ताब्यात घेतला.
ट्रक चालकाने मद्यपान केल्‍याने ट्रकवरील ताबा सुटून अपघात झाला आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे, महामार्गावर दारूबंदी असुनही असे प्रकार घडत आहेत याबद्दल संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

Saturday, 13 May 2017

युरोपसह जगातील 99 देशामध्ये कॉम्प्युटर व्हायरस हल्ला झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासह अनेक सरकारी व खासगी कार्यालयात रॅन्समवेअर या व्हायरसचा हल्ला झाला आहे.
     सायबर हल्ल्यासाठी रॅन्समवेअर नावाच्या व्हायरसचा वापर केला असल्याचं म्हटलं जात आहे. रॅन्समवेअर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कॉम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. त्यासोबत अशीही धमकी दिली जाते की, जर तुमच्या फाइल वाचवायच्या असतील तर त्यासाठी पैसे द्या.
जपान, तैवान व चीनकडून या व्हायरसला थोपवण्याकरता विशेष काळजी घेतली जात आहे,
         अद्याप भारतात व आशिया खंडात या व्हायरसचा हल्ला झाला नसला तरी प्रत्येकाला आपल्या कॉम्प्युटरवर अ‍ॅण्टी व्हायरस वापरून काळजी घेतली पाहिजे.

Wednesday, 10 May 2017

सिद्धनेर्ली (वार्ताहर)

येथील नदिकिनारा येथे खुदाई काम करण्यासाठी गेलेल्या कृष्णात बाबुराव दरी (वय ५५ वर्षे ) या कमागाराचा शॉक लागुन जागीच मृत्यु झाला. कृष्णात दरी हे मुळचे कोगनोळी येथील असून ते नदीकिनारा येथे चालू असणार्या पाईप लाईन च्या खुदाई कामासाठी आले असताना हि घटना घडली . गेल्या वादळी पावसात लाईटचे पोल उधवस्त झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणी तारा ह्या तुटून जमिनीवर पडल्या होत्या.पिण्याचे पाणी आनंण्यासाठी जात असताना  ह्या तारच्या वरती दरी यांचा पाय पडल्यामुळे त्याना विजेचा तीव्र झटका बसल्या मुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे असे समोर आले असून पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.  

Sunday, 7 May 2017

इचलकरंजी कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या रिटायर्ड डीवायएसपी प्रदीप भोसले यांच्या खासगी कार गाडीत अंबर दिवा, पोलिस अधिकार्‍यांची स्टीक  आणि ‘पोलिस’ असा बोर्ड आढळून आल्याने खळबळ उडाली. हिंदुत्ववादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पंचनामा करून चारचाकी गाडीसह संशयित वस्तू ताब्यात घेतल्या.
       पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही गाडी लढ्ढा नामक व्यक्तीच्या नावावर असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्याच्यावर मटका आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
            त्यामुळे पोलीसांची साधने वापरून या गाडीचा गुन्ह्य़ात वापर झाला जातो की काय अशी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती.
         पोलीस येईपर्यंत दरम्यानच्या काळात रिटायर्ड डीवायएसपी  भोसले यांनी ही गाडी आपली असल्याचे सांगून कोर्टातून गाडी नेण्यासाठी प्रयत्न केला. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते तर त्यांच्या गाडीच्या पुढे झोपले. त्यामुळे भोसले यांना जाग्यावरून गाडी हलवता आली नाही. यावेळी भोसले व काही कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.
             पोलीस अधिकाऱ्यांना खाजगी गाडीवर दिवा व पोलीस बोर्ड वापरण्याची बंदी आहे तरीही कोल्हापूर जिल्ह्यात राजरोसपणे कोणीही उठून दिवा व पोलीस बोर्ड लावतात हे आता स्पष्ट झाले आहे, पोलिस प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Friday, 5 May 2017

जळगाव

जळगाव येथील कारागृहाचे अधिक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने आज पहाटे ८ वाजता अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने केली.

जळगाव येथील कारागृहात वरकमाईच्या बदल्यात कैद्यांना सोयी–सुविधा पुरविण्या बाबत अनेक तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत. काही दूरचित्रवाहिन्यांनी याचे स्टिंग ऑपरेशनही वेळोवेळी केले आहे. सध्याच्या कारागृह अधिक्षकांविषयी अनेक आक्षेपार्ह किस्से चर्चेत होते. आज अखेर त्यांचाही चर्चेत येण्याचा दिवस उगवला.

या संदर्भात एसीबी पथकाने प्राथमिक स्वरुपात केलेल्या तपासातून मिळालेली माहिती अशी - जिल्हा कारागृहातून एखाद्या कैद्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय सेवेसाठी पाठवायचे असेल तर तशा परवनगीसाठी जिल्हा कारागृह अधिक्षकांचा दर प्रत्येकी ५ हजार रुपये आणि एक बाटली असा आहे.परवानगीसाठी अर्ज करताना ३ हजार आणि बाटली द्यावी लागते. प्रत्यक्ष कैद्यास नेताना २ हजारांचा व्यवहार पूर्ण होते. दिवसभरात किमान ४ ते ५ कैदी जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. म्हणजेच यातून किमान २० ते ३० हजारांचा व्यवहार होतो.

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या परवानगीचा व्यवहार ३ हजार रुपये व बाटलीपर्यंत पूर्ण झाला होता. कैद्याला पहाटे रुग्णालयात पाठवायचे तर आज पहाटे ५ ला त्याच्या नातेवाईकाला डाबेराव यांनी बंगल्यावर २ हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार संबंधित नातेवाईक व एसीबी पथक पोहचले. नंतर सकाळी ८ च्या सुमारास २ हजार रुपये घेताना आमले व डाबेराव यांना ताब्यात घेण्यात आले.

जळगाव जिल्हा कारागृह हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मागील बाजूस आहे. या ठिकाणी महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पदाचे अधिकार प्राप्त प्रांताधिकाऱ्यांची वर्दळ असते. अशाही वातावरणात कैद्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याचे धाडस कारागृहातील साखळी करते हे विशेष.

जळगाव येथे एसीबीचे उपअधिक्षक म्हणून रुजू झालेल्या पराग सोनवणे यांनी लाच घेणाऱ्या अती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडण्याच्या अनेक कारवाया यशस्वी केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत तापी पाटबंधारेचे अभियंता, महावितरणचे अभियंता, मनपा उपायुक्त, समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी आदींना जाळ्यात पकडले आहे.

सोशल मीडिया सोल्युशन यांच्या सौजन्याने