Friday, 5 May 2017

कारागृह अधिक्षक लाच घेताना ताब्यात

जळगाव

जळगाव येथील कारागृहाचे अधिक्षक डाबेराव आणि त्यांचा कॉन्स्टेबल आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने आज पहाटे ८ वाजता अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने केली.

जळगाव येथील कारागृहात वरकमाईच्या बदल्यात कैद्यांना सोयी–सुविधा पुरविण्या बाबत अनेक तक्रारी यापूर्वी झालेल्या आहेत. काही दूरचित्रवाहिन्यांनी याचे स्टिंग ऑपरेशनही वेळोवेळी केले आहे. सध्याच्या कारागृह अधिक्षकांविषयी अनेक आक्षेपार्ह किस्से चर्चेत होते. आज अखेर त्यांचाही चर्चेत येण्याचा दिवस उगवला.

या संदर्भात एसीबी पथकाने प्राथमिक स्वरुपात केलेल्या तपासातून मिळालेली माहिती अशी - जिल्हा कारागृहातून एखाद्या कैद्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय सेवेसाठी पाठवायचे असेल तर तशा परवनगीसाठी जिल्हा कारागृह अधिक्षकांचा दर प्रत्येकी ५ हजार रुपये आणि एक बाटली असा आहे.परवानगीसाठी अर्ज करताना ३ हजार आणि बाटली द्यावी लागते. प्रत्यक्ष कैद्यास नेताना २ हजारांचा व्यवहार पूर्ण होते. दिवसभरात किमान ४ ते ५ कैदी जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात. म्हणजेच यातून किमान २० ते ३० हजारांचा व्यवहार होतो.

एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या परवानगीचा व्यवहार ३ हजार रुपये व बाटलीपर्यंत पूर्ण झाला होता. कैद्याला पहाटे रुग्णालयात पाठवायचे तर आज पहाटे ५ ला त्याच्या नातेवाईकाला डाबेराव यांनी बंगल्यावर २ हजार रुपये देण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार संबंधित नातेवाईक व एसीबी पथक पोहचले. नंतर सकाळी ८ च्या सुमारास २ हजार रुपये घेताना आमले व डाबेराव यांना ताब्यात घेण्यात आले.

जळगाव जिल्हा कारागृह हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मागील बाजूस आहे. या ठिकाणी महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पदाचे अधिकार प्राप्त प्रांताधिकाऱ्यांची वर्दळ असते. अशाही वातावरणात कैद्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविण्याचे धाडस कारागृहातील साखळी करते हे विशेष.

जळगाव येथे एसीबीचे उपअधिक्षक म्हणून रुजू झालेल्या पराग सोनवणे यांनी लाच घेणाऱ्या अती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडण्याच्या अनेक कारवाया यशस्वी केल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत तापी पाटबंधारेचे अभियंता, महावितरणचे अभियंता, मनपा उपायुक्त, समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी आदींना जाळ्यात पकडले आहे.

सोशल मीडिया सोल्युशन यांच्या सौजन्याने

0 comments:

Post a Comment