Thursday, 31 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी, सर्जेराव पोवार.

कोल्हापूर येथील क्राइम ब्रांच ने सराईत घरफोडी करणारा चोरटा राजू प्रकाश नागरगोजे उर्फ राजवीर सुभाष देसाई या घरफोडी करणाऱ्या रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 घरफोडी गुन्हायातील 467 ग्रॅम वजनाचे एकूण 13,49563 रू.किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. गेले कित्येक दिवस कोल्हापूर शहर परिसरात झालेले अनेक घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अनवेशन शाखेस यश मिळाले आहे.

Tuesday, 29 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार

हिंदूंच्या पारंपारिक सणांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात ३० ऑगस्टला पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
ते म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून हिंदूंच्या धार्मिक सणांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. कायद्याचा, नियमांचा धाक दाखवून बैठकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धमक्या दिल्या जात आहेत.  कोल्हापुरातील मटका, जुगार अवैध व्यवसाय बंद होत नाहीत. खुनाचे आरोपी सापडत नाहीत. पैशाचे बक्षीस लावून खुन्याचा शोध पोलीस करत आहेत. मग पोलीस यंत्रणा काय कामाची असा सवालही या वेळी उपस्थित केला. 
 बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. गुरुवारी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी बिंदू चौकात संध्याकाळी पाचच्या सुमारास महाआरती करणार, असे संजय पोवार म्हणाले. 
 यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. या वेळी दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.

कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या अर्जावर दोन हजार रुपये लाचेची मागणी करून दीड हजार रुपये स्वीकारताना जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस  पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) याला  रंगेहाथ कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

कारवाईची चाहूल लागताच अटकेच्या भीतीने पोवार याने नोटा गिळलेने त्याची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. २८) दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या तरुणाने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे अर्ज पडताळणीसाठी आल्यानंतर पोलिस नाईक पंडित पोवार याने गुरुवारी (ता. २४) संबंधित तरुणाला बोलवून घेतले. पासपोर्ट पडताळणीचे काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोवार याने केली. यानंतर तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन पोवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक गिरिष गोडे यांनी तक्रारीची खातरजमा करून सोमवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारताच पोवार याला सापळ्याची कूणकूण लागली. कारवाईपासून पळ काढण्यासाठी त्याने पोलिस ठाण्याच्या बाहेर धूम ठोकली, मात्र एसीबीच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. याचवेळी लाचखोर पोवार याने लाचेच्या नोटा गिळंकृत केल्या.
त्याने गिळलेल्या पुराव्याचा अंश जप्त करण्याचे काम सुरू आहे.
      या निमित्ताने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या अर्जावर सही करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात लाच घेतली जाते पण नागरिक त्रास होऊ नये म्हणून तक्रार करायला धजावत नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा लाचखोर पोलीसांवर अधिकारी वर्गाने अंकुश लावायला हवा नाही तर पोलिस दलाची प्रतिमा खालावेल.

Monday, 28 August 2017

कोल्हापूर  प्रतिनिधी  दि. 28

दारूच्या नशेत  सेंट्रिंग कामगाराने स्वतःच्या आईचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज  दुपारी दोनच्या सुमारास घडला. यल्लव्वा रामा कुचकोरवी (वय ६५) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून या प्रकरणी त्यांचा मुलगा सुनील (वय ३५) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. 
यल्लव्वा या केसावर फुगे विकण्याचा व्यवसाय करीत होत्या. त्यांचा मुलगा सुनील हा सेंट्रिंगचे काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याला कंटाळून त्याची बायको आपल्या तीन मुलीं आणि एका मुलासहीत माहेरी राहात होती. आज  दुपारी दोनच्या सुमारास रामा दारू पिऊन घरी आला. नशेतच त्याने आपल्या आईवर चाकूने सपासप वार करून तिला ठार केले. घटनास्थळीचे दृश्य फारच विदारक होते. माकडवाला वसाहतीतील लोकांनी पकडून त्याला शाहूपुरी पोलिसांच्या हवाली केले.

Wednesday, 23 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार

करवीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बालिंगा रोडवर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनाची तपासणी सुरू केली होती. दुपारी दोन च्या सुमारास हॉटेल अमृत समोर रस्त्यावर भरधाव जाणार्‍या मारुती कारला MH09 S 0277 पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता चालकाने सुसाट वेगाने गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून  दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता त्यात चार चाकी वाहनांच्या बॅटर्‍या, ट्रकचा जॅक असे साहित्य आढळून आले. चौकशीअंती संशयितानी चारचाकी वाहनासह टॅक्टरमधील तब्बल 25 बॅटर्‍या चोरल्याची कबुली दिली.
शुभम ऊर्फ सुबू जयसिंग बागडे (वय 20), सनी महेश गागडे (19, रा. गणेशनगर, चंबुखडी) अशी त्यांची नावे आहेत. संशयिताना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी पत्रकार परिषदेत बागडे, गागडे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चौकशीत अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा शक्य आहे, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी  पत्रकारांना सांगितले.

चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी वाहनही व मारुती कारसह सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आल्याचे पो.नि.दिलीप जाधव यांनी सांगितले. या प्रकरणी प्रशांत माने, प्रथमेश पाटील, किरण वावरे, सुहास पाटील, राजू जरळी, सागर कांडगावे, अमोल पाटील, दीपक घोरपडे, सुमित पाटील, युक्‍ती ठोंबरे यांनी कारवाई केली.

Tuesday, 22 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार
दिनांक 22/8/2017  रोजी
शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या चोरीच्या गुन्हांना आळा बसण्याच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील स.पो.निरिक्षक श्री.पवार, स.फौजदार संदीप जाधव,पोलीस हेड काॅ.साळुंखे, पोलीस नाईक पांडव हे मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क , महावीर काॅलेज, नागाळा पाकॆ परिसरात खाजगी मोटारसायकल वरून पेट्रोलिंग करत असताना दुपारच्या सुमारास नागाळा पार्क येथील नागोबा मंदिराजवळ एक संशयित इसम नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन जात असताना स.फौजदार यांना दिसली.त्यांनी त्यास थांबवून चौकशी केली असता.त्याने घाबरतच आपले नाव सुशांत तानाजी रांगोळे  (वय वर्षे 23,रा.ग्रामपंचायत जवळ, रांगोळे गल्ली,लिंगनुर, ता.कागल, जि.कोल्हापूर )असे सांगितले त्यास त्याचे ताब्यात असेलेली मोटारसायकल बद्दल विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा संशय आल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन त्याच्या कडे चौकशी केली असता. त्याने सदर मोटारसायकल ही एक महिन्यापूर्वी स्टेशन रोड, कोल्हापूर येथील शिवशक्ती अपार्टमेंटच्या बेसमेंट मध्ये लाॅक करून लावली असता तिचे लाॅक तोडून चोरून नेल्याची कबूली दिली.त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून कसून चौकशी केली असता. त्याने यापूर्वी लक्ष्मीपूरी पोलीस स्टेशन हद्दीतील रंकाळा डी मार्ट येथून व गोकुळ शिरगाव एम. आय.डीसी.पोलीस स्टेशन हद्दीतील पंचतारांकित एम.आय.डीसीतील मेनन अॅड मेनन कंपनी जवळील येथून एक मोटारसायकल अशा तीन मोटारसायकली चोरल्या अशी कबुली त्यांने देऊन त्याच्या कडून एकूण 75000 हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करणेत आल्या. असे पोलीसांनी सांगितले.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर, व शाहुपूरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील स.पोलीस निरीक्षक पवार, स.फौजदार संदीप जाधव, निलेश साळुंखे, प्रशांत पांडव, शशिकांत पोरे,ऋषिकेश ठाणेकर, समीर मुल्ला, प्रशांत घोलप,राजेश बरगाले, विशाल चौगले केली यातील अटक आरोपी कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Sunday, 20 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार

दिनांक 20/8/2017 रोजी मधुमालती काॅलनीत पहाटे 3.30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल सदाशिव शिंदे, वय वर्षे 30,व्यवसाय शिक्षक ,मुळ राहाणार-शिंपे ता.शाहुवाडी व सध्या रहाणार 31  बी मधुमालती काॅलनी, कसबा बावडा, कोल्हापूर. हे बत्तीस शिराळा, जिल्हा सांगली, सह्याद्री पब्लीक स्कुल मध्ये नृत्य शिक्षक म्हणून नोकरीस आहेत व त्यांच्या पत्नी श्वेता सुनिल शिंदे ह्या एमआयडीसी शिरोली या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. हे दोघे पती- पत्नी आपल्या घराला कुलूप लावून आपल्या मूळ गावी शिंपे ता. शाहुवाडी येथे गेले होते.मधुमालती काॅलनीतील त्यांच्याच शेजारील रहाणारे संताजी हिंदुराव पाटील यांना सुनिल शिंदे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकलेला दिसला. त्वरित याची माहिती त्यांनी मोबाईल फोन वरून सुनिल शिंदे यांना दिली.शिंदे यांनी गावाहून परत येऊन आपल्या रहात्या घरी पाहिले असता मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. घरात जाऊन बघितल्यावर हाॅल मधील कोचवर  बेडरूम मधील लाकडी कपाटातील दागिने ठेवण्याचा डबा रिकाम्या अवस्थेत पडलेला दिसला व पर्सही दिसली. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन बेडरूम  बघितल्यावर लाकडी कपाटाचा दरवाजा व त्यामधील ड्राॅवर बाहेर ओढलेले दिसले.त्यातील गळ्यातील सोन्याचे  मंगळसुत्र , सोन्याची साखळी, पेंडल. सोन्याच्या पाटल्या, खडे असलेल्या सोन्याच्या  दोन अंगठ्या, झुबे, नथ व नथणी, चांदीचे ब्रेसलेट पैंजण, अंगठ्या असा सुमारे एक लाख ऐक्याऐंशी हजाराचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
याची नोंद  शाहुपूरी पोलिस स्टेशनला झाली असून अधिक तपास शाहुपूरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री संजय मोरे करत आहेत.

Saturday, 19 August 2017

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य दै.सकाळ चे पत्रकार प्रकाश तिराळे आणि कागल तालूका सदस्य व दै.तरुण भारत चे पत्रकार समीर कटके यांना मुरगूड पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अशोक पाटील याने अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आज कागल,राधानरी व भुदरगड तालुक्यातील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन चे सर्व पत्रकार बंधू व छायाचित्रकार मुरगूडमध्ये एकवटले.ठाण्याच्या परिसरात 'पोलिसांची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.,पत्रकार एकजूटीचा विजय असो' च्या घोषणा देत मुरगूड पोलीस ठाण्यावर धडक दिली.यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश हांडे यांना भेटून संबंधित पोलीस अशोक पाटील याच्यावर तात्काळ कारवाई करावी.अशी जोरदार मागणी करण्यात आली.ठाण्यात वृत्त संकलनाच्या निमित्ताने येणाऱ्या पत्रकारांना येथील कर्मचारी व्यवस्थीत माहिती देत नाहीत.बऱ्याचवेळा डायरीला नोंद असणारी माहिती लपवली जाते.अशा तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या.यावेळी पत्रकारांचा अपमान करणाऱ्या अशोक पाटील याचा गांधीगिरी पध्दतीने जाहीर निषेध करताना करण्यात आला.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश हांडे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून पत्रकारांना दुय्यम वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी.अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा दिला. यावेळी पत्रकार भाऊसो सकट,( दै.पुढारी),प्राचार्य महादेव कानकेकर,(पुण्यनगरी) उपप्राचार्य श्याम पाटील,( दै.पुढारी) संतोष मोरबाळे,(वरिष्ठ उपसंपादक लोकमत),प्रा. सुनील डेेळेकर,( दै.पुढारी), श्रीकांत जाधव,(बी.न्यूज),अनिल पाटील,(लोकमत),संदीप सूर्यवंशी,(सामना), प्रा.रविन्द्र शिंदे,(तरुणभारत),प्रा.सुनील खोत, (तरुणभारत), दिलीप निकम,( महासत्ता),प्रकाश कारंडे,(महाराष्ट्र टाईम्स),प्रकाश तिराळे,(सकाळ),समीर कटके,(तरुणभारत), प्रा. एकनाथ पाटील,( दै.पुढारी) सागर मोरे,(तरुणभारत),समाधान म्हातुगडे,(सकाळ), शशिकांत भोसले,(लोकमत), विष्णुपंत इंगवले,( महासत्ता),अवधूत आठवले (पुण्यनगरी),प्रशांत साठे,(पुण्यनगरी) अरविंद सुतार,(सकाळ), तुकाराम कुंभार,( महासत्ता), दत्तात्रय वारके,(सकाळ),सुहास घोरपडे ( एस.पी.एन.न्यूज), छायाचित्रकार राजू चव्हाण,जे.के.कुंभार,रोहित लोहार, प्रल्हाद कांबळे,सागर लोहार,सचिन पाटील आदी पत्रकार ,छायाचित्रकार उपस्थित होते.

Friday, 18 August 2017

प्रतिनिधी संदीप पोवार दिनांक 17/8/2017

शाहुपूरी पोलिस स्टेशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कसबा बावड्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांची मिटींग श्रीराम सोसायटीच्या हाॅल मध्ये संपन्न झाली.
यंदाच्या वर्षी ही कसबा बावड्यातील गणेशोत्सव डाॅल्बीमुक्त करणार असा निर्धार शाहुपूरी पोलिस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक श्री संजय मोरे यांच्या समोर सर्व गणेश मंडळानी केला. यात छत्रपती शिवाजी राजे तरूण मंडळ ,स्वस्तिक मित्र मंडळ, सस्पेन्स स्पोर्टस् , भारतवीर मित्र मंडळ, शिवसेना शाखा क्रमांक 16 जय भवानी गल्ली,रिलॅक्स मित्र मंडळ व इतर गणेश मंडळाच्या वतीने डाॅल्बी न लावता पारंपारिक वाद्याचा वापर करणार असे सांगितले. त्यावर पोलीस निरीक्षक संजय मोरे म्हणाले की तुम्ही पोलीस प्रशासनाला सर्व तोपरीने मदत करत असाल तर पोलीस प्रशासनही तुम्हाला सहकार्य करील.यावेळी पोलिस मित्रांचाही सत्कार करण्यात आला.
शाहूपुरी पोलीस स्टेशनचे गोपनीय कक्षाचे सचिन पाटील व शिवाजी पाटील यांचे व बावड्यातील गणेश मंडळाचे मित्रत्वाचे संबंध असल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक, गावकामगार पाटील व गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Thursday, 17 August 2017

मुरगुड प्रतिनिधी समीर कटके

कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार 

     मौनीनगर बिद्री ता कागल येथील ऍक्सिस बँकेची  एटीएम मशीन 15 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना मुरगुड पोलिसांनी तिघांना रंगे हात पकडले. उत्तम तानाजी वायदंडे वय 23 रा नाधवडे ता. भुदरगड रणजित आनंद वायदंडे वय 22 रा बस्तवडे ता कागल, विशाल बाजीराव वायदंडे वय 25 रा येवती ता करवीर या तिघांना मुरगुड पोलिसांनी इनोव्हा कार सह ताब्यात घेतले आहे.  गुन्ह्याची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.
     पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हिताची कंपनी मार्फत ऍक्सिस बँकेचे मौनी नगर बिद्री येथे एटीएम मशीन कार्यरत आहे. हे मशीन5 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास इनोव्हा कार एम एच 10 ए एन 9219 मधून आलेल्या उत्तम तानाजी वायदंडे वय 23 रा नाधवडे ता. भुदरगड रणजित आनंद वायदंडे वय 22 रा बस्तवडे ता कागल, विशाल बाजीराव वायदंडे वय 25 रा येवती ता करवीर या तिघांनी फोडण्याच्या प्रयत्न केला.  एटीएम मध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व अलर्ट सिस्टम  मुंबई येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयास सॅटेलाईटच्या माध्यमातून जोडलेले आहेत.  या अत्याधुनिक यंत्रणेची पुसटशी कल्पनाही संशयितांना नव्हती.मुंबई कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सव्वा दोनच्या सुमारास बिद्री लोकेशनवरील एटीएम मध्यें संशयास्पद हालचाली, प्रखर ज्वाला व खाली ओढलेले शटर पाहून           क्षणार्धात मुरगुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना संपर्क साधला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालक महादेव अबिटकर नाईट पॅट्रोलवर असणारे   भारत मेटल, कृष्णा पाटील, दीपक गुमाने या रात्रगस्तीच्या पोलीसानी आपला जीव धोक्यात घालून एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघांना इनोव्हा कार मधील एअर गन सह रंगे हात पकडले. या कर्मचाऱ्यांना दोन  वाजता माहिती मिळाली विजेच्या वेगाने हालचाल करत केवळ 10 मिनीटात ते बिद्री येथील घटना स्थळी पोहोचले. यावेळी उत्तम वायदंडे शटर ओढून एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने तोडत होता तर विशाल व रणजित बाहेर टेहाळणी करत होते. पोलीस जागेवर पोहोचल्यावर विशाल व रणजित यांनी पळ काढला विशाल मुधाळ तिट्ट्याच्या दिशेने तर रणजित कोल्हापूरच्या दिशेने दुधगंगा नदी पुलाकडे पळाला. प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांनी एटीएम मध्ये असणाऱ्या संशयित आरोपीस पकडण्यासाठी शटर उघडून  आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण उत्तमने आतील सिलिंग फोडून पोट माळ्यातून पलीकडील खोलीत प्रवेश केला. हातामध्ये शस्त्र असल्यामुळे दक्ष राहून कृष्णा पाटील व चालक महादेव अबिटकर यांनी उत्तम ला जेरबंद केले. तर मुधाळ तिट्याच्या दिशेने पळत सुटलेल्या विशालला पकडण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुमाने व भारत मेटल यांनी धाव घेतली. घटना स्थळापासून अंदाजे दीडशे दोनशे मीटर अंतरावर पाठलाग करून रस्त्याकडेला शेतात असणाऱ्या   ओढ्यात विशालला पकडले.     या एटीएम मशीन मध्ये 14 ऑगस्ट रोजी 20 लाख रुपये भरण्यात आले होते. तर त्यातील 15 लाख रुपये ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला  त्यावेळी शिल्लक होते. पण चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित चोरट्यांना त्यातील एक नोटदेखील काढता आली नाही असे सांगण्यात आले. इनोव्हा कारमधून गॅस कटर, सिलेंडर व एक एअरगन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले.
     स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणारे महादेव अबिटकर, कृष्णा पाटील, दीपक गुमाने, भारत मेटल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. २०१० साली भरती झालेले कृष्णा , दीपक व भारत उत्तम खेळाडू आहेत तर 2010 साली महादेव अबिटकर सेवेत रुजू झाले. त्यांच्या कामगिरीची दखल शासन व पोलीस दलाने घ्यावी व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
          दरम्यान मुरगुड पोलिसांनी जीव धोक्यात घालून ए टी एम मशीन फोडणाऱ्या चोरट्यांना रंगे हात पकडल्या बद्दल आम मुश्रीफ यांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या मुरगुड कार्यालयात सपोनि राकेश हांडे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला. पोलीस उपअधीक्षक सागर गुरव यांनी पोलीस ठाण्यास भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली.   
  गुन्ह्यांचा तपास सपोनि राकेश हांडे करत आहेत.


Tuesday, 15 August 2017

हेरले/ प्रतिनिधी दि. १४/८/१७

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची  कर्जमाफी संदर्भात केलेली घोर फसवणूक व सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यासाठी सोमवारी सकाळी ११ . ३० च्या सुमारास कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. सुमारे अर्धा तास हे आंदोलन चालल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या .
यावेळी काँ. अतुल दिघे यांनी फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. तसेच केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू  कराव्यात अशी मागणी केली.
             शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे यांनी राज्य सरकारने जाहिर केलेली कर्जमाफी ही संधिग्ध व प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसवी आहे .तसेच त्यांची दिशाभूल करुन आंदोलन हाणुन पाडण्याचा  प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. हे लक्षात घेवुन कोल्हापूर जिल्हा शेतकरी  सुकाणू  समितीने  जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले असल्याचे काटे यांनी सांगितले .
या वेळी काँ. उदय नारकर, भाकपाचे सतीशचंद्र कांबळे, आम आदमी पक्षाचे संदिप देसाई, कोल्हापूर कामगार संघटनेचे,इब्राहीम जंगले, गिरीष फोडें यांची भाषणे झाली. तसेच या आंदोलनात मुसाभाई देसाई , निशिकांत पद्माई , जनरल कामगार युनियनचे काँ.प्रकाश कांबरे , माणिक शिंदे , ईब्राहिम जंगले यांची  प्रमुख उपस्थिती होती.
     हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष , स्वाभिमानी  शेतकरी  संघटना , श्रमिक संघटना , भारतीय किसान सभा , शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना , मेकँनिकल व कामगार युनियन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम  आदमी, कोल्हापूर कामगार संघटना ,
        पोलीस उपअधिक्षक आर .आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. हेरले मंडल अधिकारी श्री .कोळी ,गावकामगार तलाठी नितिन कांबळे , कोतवाल संदिप पुजारी हे महसुल अधिकारी उपस्थित होते.
पो .नि. संजय मोरे, शिरोली पोलीस ठाण्याचे सहा .पो.नि.परशुराम कांबळे, मनिषा नारायणकर, मनिषा गबाले ,  विजय पाटील, पोलीस  व होमगार्ड कर्मचारी यांची  मोठी फौज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.

Monday, 14 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार 14/8/2017
 
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर शहरात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत रहावे या करता कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम बोडींग, अकबर मोहल्ला, सोन्यामारूती चौक,सीपीआर हाॅस्पिटल, दसरा चौक अशा मार्गावर पोलीसांनी संचलन केल त्यामध्ये शहरातील शाहुपूरी ,लक्ष्मीपूरी,राजारापूरी,
जुनाराजवाडा त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कोल्हापूर दंगल नियंत्रण पथक यांचा समाविष्ट होता.अचानक इतक्या पोलीसांचा जमाव पाहून नागरिकांमध्ये गोंधळ उडाला पण नंतर पोलीसांचे हे सुत्रसंचालन गणेशोत्सवाच्या तयारीला आहे हे समजल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Sunday, 13 August 2017

लातुरच्या अधिकाऱ्याला मुंबई एसीबीने पकडलं !

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमनं लातुरात रात्रभर कारवाई करून आपल्याच विभागाच्या   डीवायएसपी वर गुन्हा दाखल केला. डीवायएसपी सुरेश शेटकर हे छोटू गडकरी या मध्यस्थामार्फत आरटीओ कार्यालयातल्या अधिकाऱ्याकडे लाच मागत होते. आरटीओ अधिकाऱ्याने मुंबई एसीबीला तशी तक्रार कळवल्यानंतर, एसीबीने छोटू गडकरीला ताब्यात घेतलं. पण डीवायएसपी अद्यापही सापडले नसल्याने शोध सुरू आहे.

        अजून कारवाई सुरु आहे. या कारवाईमुळे   लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातचं तक्रारीवरून लाचखोरी असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं असून लोकांना विश्वास तरी कोणावर ठेवायचा हे कळेना झाले आहे.

प्रतिनिधी संदीप पोवार
दिनांक 12/8/2017

शाहुपूरी पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक श्री संजय मोरे यांची कसबा बावड्यातील  पोलिस मित्रांनी सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 
     त्यावेळी नूतन पो.नि.मोरे यांनी पोलिस मित्रांना सांगितलं की तुमच्या सारख्या युवापिढीची पोलिस दलाला गरज आहे .  व्यसनाच्या आहारी न जाता पोलिस दलात भरती होवून समाजाचे व देशाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आणल्या परिसरात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवणारे प्रकार घडत असतील तर त्वरित पोलिसांना कळवण्याच्या सूचना देखील केल्या.
    यावेळी पोलिस मित्र अंकुर कुंभार , भिमराव पोवाळकर, दिपक स्वामी, ऋतुराज परीट, केतन पाटील, गणेश कदम,अवधूत शिंदे,शिवम निकम, ओकांर मोहिते, अभिजित बाचणकर आदि उपस्थित होते.

Saturday, 12 August 2017

कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार 

‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या व कोल्हापूर सहित राज्यातील अनेक शहरात चेन चोरी गुन्हे करणाऱ्या या दोघा इराणी चेन स्नॅचरना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने मध्यवर्ती बसस्थानकावर अटक केली. संशयित काशीम गरीबशहा इराणी (वय २९, रा. इराणी वस्ती, श्रीरामपूर, जि. अहमदनगर), अब्बास सल्लू जाफरी (२०, रा. भास्कर स्कूलच्या समोर पाटीलनगर, आंबिवली, कल्याण, जि. ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूर, नाशिक, पुणे व निपाणी-बेळगांव आदी ठिकाणच्या चेन स्नॅचिंगच्या आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांचे १९ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. अतिशय चलाखपणे चेन स्नॅचिंग करण्यामध्ये या दोघांचा हातखंडा आहे. त्यांची टोळी कार्यरत असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.