Tuesday, 29 August 2017

पासपोर्टसाठी दीड हजार रुपये लाच स्वीकारताना जुना राजवाडाच्या पोलीसाला अटक

कोल्हापूर प्रतिनिधी - संदीप पोवार

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या अर्जावर दोन हजार रुपये लाचेची मागणी करून दीड हजार रुपये स्वीकारताना जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस  पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) याला  रंगेहाथ कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

कारवाईची चाहूल लागताच अटकेच्या भीतीने पोवार याने नोटा गिळलेने त्याची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोमवारी (ता. २८) दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेल्या तरुणाने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे अर्ज पडताळणीसाठी आल्यानंतर पोलिस नाईक पंडित पोवार याने गुरुवारी (ता. २४) संबंधित तरुणाला बोलवून घेतले. पासपोर्ट पडताळणीचे काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोवार याने केली. यानंतर तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन पोवार याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिस उपअधीक्षक गिरिष गोडे यांनी तक्रारीची खातरजमा करून सोमवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारताच पोवार याला सापळ्याची कूणकूण लागली. कारवाईपासून पळ काढण्यासाठी त्याने पोलिस ठाण्याच्या बाहेर धूम ठोकली, मात्र एसीबीच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. याचवेळी लाचखोर पोवार याने लाचेच्या नोटा गिळंकृत केल्या.
त्याने गिळलेल्या पुराव्याचा अंश जप्त करण्याचे काम सुरू आहे.
      या निमित्ताने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या अर्जावर सही करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात लाच घेतली जाते पण नागरिक त्रास होऊ नये म्हणून तक्रार करायला धजावत नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा लाचखोर पोलीसांवर अधिकारी वर्गाने अंकुश लावायला हवा नाही तर पोलिस दलाची प्रतिमा खालावेल.

0 comments:

Post a Comment