प्रतिनिधी सर्जेराव पोवार
कोल्हापूर दि ३१/०३/२०१७ :
पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे *DAR ( DETAILED ACCIDENT RECORD ) सविस्तर अपघात अहवाल* बाबत कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये अपघातामध्ये पिडीत व्यक्तीस संबंधितांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी व विलंब टाळण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिले आदेशाप्रमाणे व सूचनेप्रमाणे महाराष्ट्र पोलीस मध्ये दि. ०१/०४/२०१७ पासून सदर कार्यप्रणाली ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सदर कार्यप्रणाली मध्ये मोटार अपघात बाबत गुन्हा दाखल झालेनंतर सदर गुन्ह्याची प्रथम खबर अहवाल (FIR) ची प्रत ४८ तासाचे आत मोटार अपघात प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात येईल त्यानंतर ३० दिवसाचे आत सविस्तर अपघात अहवाल १० विविध फोर्म मध्ये माहिती भरून मोटार प्राधिकरण अपघात विभागाकडे पाठविले जाईल. तसेच त्याची एक प्रत संबंधित विमा कंपनीस व वाहन धारकास ३० दिवसात देणे आवश्यक आहे. या कार्यप्रणाली करिता प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये यासंबंधी १ स्वतंत्र रजिस्टर ठेवले जाऊन त्यामध्ये याच्या नोंदी घेतल्या जातील व संबंधित विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी याबाबत पर्यवेक्षण करतील. सदर कार्यप्रणाली मध्ये परिवहन विभाग तसेच वैद्यकीय अधिकारी याच्याकडून नमूद फोर्म प्रमाणे माहिती भरून घेतली जाईल त्यामुळे मोटार वाहन अपघातातील तपासामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा होवून पिडीत व्यक्तीस नुकसान भरपाई मिळणे सोयीस्कर होणार आहे.
सदर कार्यप्रणाली चे कोल्हापूर पोलीस दलाचे जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून श्री. सतीश माने, पोलीस उप अधीक्षक (गृह) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
पोलीस अधीक्षक श्री. एम. बी. तांबडे यांनी अपर पोलीस अधीक्षक, सर्व उप विभागीय अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सविस्तर अपघात अहवाल कार्यप्रणाली चे काटेकोर पालन करण्याबाबत आदेश दिले आहेत.






















