Wednesday, 7 June 2017

मुरगुड येथे घरफोडी दिवसा ढवळ्या 17 तोळे सोन्याच्या दागिन्यासह एकूण साडेसात लाखाचा ऐवज लांबवला

मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

        मुरगुड ता  कागल येथील सावर्डेकर कॉलनीत राहणाऱ्या यशवंत गजानन भाट यांच्या सरस्वती निवास या बंगला अज्ञात चोरट्यानी दिवसा ढवळ्या फोडून 17 तोळे सोने व रोख अडीच लाख रुपये असा अंदाजे साडेसात लाखाचा ऐवज लांबवला.
             मुरगुड येथील वायशाज गॅरेजचे मालक यशवंत भाट  सावर्डेकर कॉलनीतील सरस्वती निवास या दुमजली इमारतीत आपली आई, पत्नी व दोन मुलांसह राहतात. आज सकाळी 9 वा सर्व कुटुंबासह चंदगड या ठिकाणी रवळनाथाचे दर्शनासाठी गेले होते.अंदाजे दुपारी12 ते 1:30 वा. दरम्यान घरफोडी झाली. चोरट्यानी बंगल्याच्या मुख्य दरवाजाच्या  आडण्याची अडक ( लॅच ) कापून घरात प्रवेश केला वरील मजल्यावर असणाऱ्या बेडरूम मध्ये प्रवेश करून कोपऱ्यात असणाऱ्या तिजोरीचे दरवाजे उचकटून दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारला.वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या भाट यांनी आपले जुने वाहन विकून नवे वाहन घेण्यासाठी ही रक्कम घरी ठेवली होती. त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या रेखा तानाजी गोंधळी या महिलेस दुपारी 3 च्या दरम्यान  भाट यांच्या बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला, चौकशी करण्यास त्या आल्या असता त्यांना दरवाजाची लॅच कापलेली असून  कुलूप लावलेले  असतानाही दरवाजा उघडा दिसला.तसेच घरी कोणीही नाही हे पाहिल्यानंतर त्यांना संशय आला व  त्यांनी काही अंतरावर राहणारे यशवंत भाट यांचे बंधू लक्ष्मण भाट यांना माहिती दिली व घटना उघडकीस आली.

       दरम्यान दुपारी चार वाजता भाट कुटुंबिय चंदगडहुन परतल्यानंतर त्यांनी पोलीसात तक्रार नोंदवली. अंदाजे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मुरगुड पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथकास पाचारण केले. रात्री 8 वा. पथकातील अधिकारी उपनिरीक्षक दिलीप पाटील व पोलीस नाईक प्रदीप माने यांनी झेबा या श्वानासह  तपास सुरू केला. घटनास्थळी तिजोरी व आतील चोरट्यांनी हाताळल्या वस्तूंचा वास दिल्यानंतर झेबा बेडरूम मधून तडक बाहेर पडून दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर चढली .पुन्हा खाली येऊन दुसऱ्या बेडरूम मध्ये फिरली. त्यानंतर तडक  हॉलमध्ये प्रवेश करत घरातून बाहेर पडली. समोरील रस्त्यावरून कापशी रोडवरील सूर्यवंशी कॉलनीच्या कमानीच्या जागेवरून काही काळ रस्त्यावरच फिरत राहिली, त्यानंतर पुन्हा घटनास्थळी आली. गुन्हा केल्यानंतर संशयित वाहनावरून निघून गेले असावेत असा कयास आहे.फिंगर प्रिंट्स अधीकारी सपोनि जिरगे यांच्या पथकाने संशयितांच्या बोटांचे ठसे घेतले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासासाठी महत्वाच्या सूचना दिल्या. मुरगुडचे सपोनि राकेश हांडे यांच्यासह सपोनि ए एस तांबे व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.

0 comments:

Post a Comment