प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
मित्राला मारहाण का केलीस, याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरून ढकलून त्याचा खून केला. गजानन महाराजनगरातील स्वाती विहार अपार्टमेंटमध्ये बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. अमित सुनील दावणे (वय २३, रा. बी वॉर्ड, घर नं. १८६९, वारे वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या खून प्रकरणी श्रीराम कोगनोळीकर (वय ४५, रा. स्वाती विहार अपार्टमेंट) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हा घडल्यापासून तो कुटुंबीयांसह घरातून पसार झाला आहे.
अमित सुनील दावणे (वय २३, रा. वारे वसाहत) याला त्याचा मित्र सागर टिपुगडेने फोन करून वाद मिटवण्यासाठी व जाब विचारण्यास बोलवून घेतले. बुधवारी रात्री ११.३0 वाजता अमित गजानन महाराजनगरात पोहोचला. सागर व अमित हे दोघे कोगनोळीकर यांच्या घरात जाब विचारण्यास गेले.
अमित दावणे याने सागरला का, मारलेस असा जाब कोगनोळीकरला विचारला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. 'या प्रकरणात तुझा काय संबंध,' असे म्हणून श्रीराम कोगनोळीकर यांनी अमितला ठोसा मारून स्वाती विहार अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरून ढकलून दिले. तिसर्या मजल्यावरून खाली डोक्यावर पडल्याने अमित दावणे गंभीर जखमी झाला. सागर टिपुगडे यांनी तातडीने रिक्षातून अमितला रात्री १२.१५ वाजता सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री १२.४५ वाजता अमितचा मृत्यू झाला.
0 comments:
Post a Comment